मालेगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवसही एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नसल्यामुळे कोरडा गेला आहे. महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी २९ एप्रिल ते ६ मे पर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आहे. रविवारी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केंद्रांकडे पाठ फिरवली होती. अनामत रक्कम व इतर कागदपत्रांच्या पूर्ततेतच इच्छुक उमेदवार अडकल्याचे दिसून येत आहे. तिकीट वाटपाचाही तिढा बहुतांशी राजकीय पक्षांचा सुटलेला दिसत नाही. भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कल्याणचे आमदार व पक्षनिरीक्षक नरेंद्र पवार, संघटनमंत्री किशोर काळकर, आमदार अपूर्व हिरे, महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत मालू कॉम्प्लेक्स येथे घेण्यात आल्या. तर शिवसेनेच्या गोटात रविवारीही शांतता दिसून आली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे रविवारी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित होते; मात्र तिकीट वाटपाविषयीची कुठलीही हालचाल दिसून आली नाही. शेवटच्या दोन दिवसांत विक्रमी नामांकन अर्ज दाखल होण्याचे चिन्ह दिसत आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही रविवारी कुठलेच काम नसल्याचे दिसून आले.
दुसरा दिवसही अर्जाविना कोरडा
By admin | Updated: May 1, 2017 00:16 IST