नाशिक : शहर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोड्यांसह सोनसाखळी चोरीच्या घटना नित्यनेमाने घडत असून, वाहनचोरीचेही सत्र सुरू असल्याचे विविध घटनांमधून समोर आले आहे. दोन दुचाकींसह एक ट्रक चोरट्यांनी पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे.भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निवृत्ती संकुलाजवळील उड्डाणपुलाखाली उभी असलेली टाटा कंपनीची तीन लाख रुपये किमतीची मालट्रक (एमएच ०४ ई.एल २९८०) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रकमालक अतुल शिवराम सैंदाणे (२५, रा. अशोकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीवरून वाहनचोरांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या घटनेत शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयामधील वाहनतळातून अज्ञात वाहनचोरांनी दुचाकी (एमएच १५ डीझेड ६६८९) पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. सुमारे तीस हजार रुपये किमतीची ‘हिरो पॅशन प्रो’ मोटारसायकल पळवून नेल्याप्रकरणी संतोष शशिकांत धात्रक (वय २७, रा. धात्रकवाडा, भगूर) यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी वाहनचोरीची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे उघडकीस आले आहे. कॉलेजरोडवर मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या प्रणव बाळकृष्ण कमोदकर (वय २०, रा. आकाशगंगा सोसायटी, भाभानगर) या युवकाची दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रणव यांच्या फिर्यादीवरून ३५ हजार रुपये किमतीची हीरो कंपनीची करिझमा दुचाकी (एमएच १५ डीएक्स ५४५०) चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनचोरीचे सत्र
By admin | Updated: December 3, 2015 23:31 IST