नाशिक : देशाच्या अर्थव्यवस्थेतील चालक हा अतिशय महत्त्वाचा घटक असून वाहतूक क्षेत्रात काम करत असताना चालकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे चालकांनी आपल्या कामाविषयी न्यूनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही. चालक करत असलेले काम हे विकासाला गती देणारे आहे. त्यामुळे त्यांनी तणावमुक्त राहून वाहने चालवावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वासुदेव भगत यांनी केले आहे.
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. १७) चालक दिनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी नारायण लॉन्स, कोणार्कनगर येथे नाशिक महापालिकेच्या सहकार्याने तीनशे चालकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टचे उपाध्यक्ष विजय कालरा, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, सुभाष जांगडा आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चालकांच्या लसीकरणासोबतच चालकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. त्याचबरोबर २५ वर्ष अपघातरहित सेवा बजावणाऱ्या चालकांचा व वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला चालकांचा सत्कार सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केले.
चालकांना वाहतूक करीत असताना प्रती १०० किलोमीटर अंतरावर विश्रांतीगृह निर्माण करण्याची गरज आहे. एमआयडीसी परिसरात ट्रक टर्मिनलची व्यवस्था असावी जणेकरून याठिकाणी वाहनांची अधिक गर्दी होणार नाही. अपघात टाळले जातील आणि चालकांना देखील सुविधा उपलब्ध होतील. नाशिक तसेच सिन्नर येथील एमआयडीसीमध्ये राखीव भूखंडावर ट्रक टर्मिनल उभे करण्यात यावे, यासाठी देखील नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे.
-राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक डिस्ट्रिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन
180921\18nsk_25_18092021_13.jpg
२५ वर्ष अपघात रहित सेवा बजावणाऱ्या सत्कारार्थी वाहन चालकांसमवेत व्यापाठीवर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टचे उपाध्यक्ष विजय कालरा, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, सुभाष जांगडा आदी