पंचवटी : दिंडोरीरोडवरील प्रभाग क्रमांक १ मधील कलानगर तसेच म्हाडा कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरात सध्या कमी वेळ व अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रभागात नागरी वसाहत दाट असल्याने त्यातच या भागातील जलकुंभातून अन्य भागात पाणी वितरित होत असल्याने व इमारतीत राहणारे नागरिक पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटारीचा वापर करतात. परिणामी पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत आहे. मोटारीने पाणी खेचले जात असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही आणि पाणी खेचण्यासाठी वीज मोटार वापरणाऱ्यांवर महापालिकेचे कर्मचारी कारवाई करीत नाही, अशी परिस्थिती सध्या दिंडोरीरोडसह संपूर्ण पंचवटी परिसरात दिसून येते. प्रभागातील कलानगर व म्हाडा कॉलनी भागात दरवेळेस उन्हाळ्याच्या प्रारंभीपासूनच नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांनी केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)