सटाणा : सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी आपण अग्रक्रम देणार असून, लोकसभा अधिवेशनानंतर गट व गण निहाय समस्या व अडचणी समाजावून घेण्यात येवून त्या सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन धुळे लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. सटाणा येथे डॉ. सुभाष भामरे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचा समारंभ रद्द करण्यात आला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉ. भामरे बोलत होते. यावेळी भामरे म्हणाले संपुर्ण मतदार संघात आपण पदाधिकार्यांच्या भेटीगाठी व आभार दौर्यास प्रारंभ केलेला आहे. दि. ४ जून पासून लोकसभेचे विशेष अधिवेशन होत आहे. ते झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकसभा मतदार संघात आपण आभार दौर्याचे आयोजन करणार आहोत.शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याच्या समस्या सार्वजनिक स्वरूपाच्या आहेत. त्या सोडविण्यासाठी आपण अग्रक्रम देणार आहोत. केंद्रात महायुतीची सत्ता असल्याने निश्चितपणे आपण त्या सोडविण्यासाठी कटीबद्ध आहोत. पतंप्रधान कार्यालयात खासदारांसाठी समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून त्या ठिकाणी आॅनलाईन कामकाज सुरू केल्याने जनतेच्या समस्या व प्रश्नांची तड तात्काळ लागण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी खासदार डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले. सटाणा शहराचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणेसाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार असून यासाठी लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी खासदार डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस आमदार उमाजी बोरसे, भाजपा जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष किशोर भामरे, समको बँकेचे माजी चेअरमन श्रीधर कोठावदे, आण्णा अहिरे, नगरसेवक साहेबराव सोनवणे, जि. प. सदस्या सुनिता पाटील आदी उपस्थित होते.
सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न
By admin | Updated: June 2, 2014 01:17 IST