नाशिक : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारून एकतर्फीच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा पदभार स्वीकारणारे राजेंद्र निफाडकर यांच्या नाशिक येथील बदलीला राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्थगिती दिली असून, सोमवारपासून कार्यालयात न आलेल्या निफाडकरांच्या अनुपस्थितीत पुन्हा प्रभारी अधिकाऱ्यांनी एकतर्फी पुरवठा खात्याचा पदभार स्वीकारला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारीपदावर गेल्याच आठवड्यात अन्न व नागरी पुरवठा विभागाने त्यांच्याच मूळ खात्याचे राजेंद्र निफाडकर यांची बदली केली होती. मात्र निफाडकर रुजू होण्यास आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे पुरवठा विभाग विरुद्ध महसूल असा सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असताना प्रत्यक्षात तसेच झाले. सलग सहा दिवस वाट पाहूनही रुजू करून घेतले जात नसल्याचे पाहून निफाडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीतच जिल्हा पुरवठा अधिकारीपदाचा पदभार निफाडकर यांनी एकतर्फी स्वीकारला होता. त्यावरून बरीच चर्चा झडली होती. जिल्हा पुरवठा अधिकारीपदासाठी कायमस्वरूपी अधिकारी हवा असल्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली होती, तर निफाडकर हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्यामुळेच त्यांना विरोध होता, त्यातच मंगळवारी सायंकाळी अन्न व नागरी पुरवठा विभागाने दोन ओळीचा आदेश काढून राजेंद्र निफाडकर यांची नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारीपदावरील बदली स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. मात्र मंगळवारी निफाडकर हे कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत, त्यामुळे सायंकाळी उपजिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून एकतर्फी पदभार स्वीकारला.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची पुन्हा बदली
By admin | Updated: December 8, 2015 22:52 IST