नाशिक : शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तालुका व विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचे कामकाज पूर्ण झाले असून, शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षपदासाठी बुधवारी (दि़१५) निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ या दोन्ही पदांसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने माजी पालकमंत्री व जिल्हा प्रभारी तथा आमदार छगन भुजबळ या पदांवर कोणाची वर्णी लावतात याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेसने नेमून दिलेल्या पदाधिकारी निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक रविवारी (दि.१२) होणार होती़ मात्र, त्यामध्ये बदल करण्यात आला असून, बुधवारी सकाळी अकरा वाजता शहराध्यक्ष, तर दुपारी बारा वाजता जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे़ तालुका व विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत़ बुधवारी होणाऱ्या शहराध्यक्ष निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद लाड, तर जिल्हाध्यक्षपदासाठी सुनील भुसारा काम पाहणार आहेत़ दरम्यान, या निवडणुकीची सूत्रे राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणानुसार त्या त्या जिल्ह्यांसाठी त्या जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या त्या काळातील माजी मंत्र्यांकडे असून, नाशिकची सूत्रे माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्याकडे आहेत़ दरम्यान, शहर व जिल्हाध्यक्ष-पदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने या पदांवर कोणाची वर्णी लागते ते पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे़
जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक रविवारी
By admin | Updated: April 13, 2015 01:21 IST