नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची रक्कम परस्पर काढून घेण्याच्या आरोपामुळे कारागृहात असलेले माजी खासदार बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विविध आरोपांचा ठपका ठेवत, सभापती कार्यक्षम नसल्याचे सांगत हे पद काढू का नये, अशी नोटीस मंगळवारी (दि. १०) जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी देवीदास पिंगळे यांना बजावली आहे. नाशिक बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्त्याची असलेली रक्कम हडप केल्याच्या आरोपाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सभापती पिंगळे यांना गेल्या माहिन्यात अटक केली. यानंतर, पिंगळे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे देवीदास पिंगळे सद्यस्थितीत कारागृहात आहेत.पिंगळे कारागृहात असताना ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बाजार समितीतील कर्मचारी रक्कम अपहार प्रकरणात अटक झालेली आहे. बाजार समितीच्या भूखंड विक्र ी व्यवहारात बेकायदेशीरपणा असल्याचे चौकशी अहवालात निष्पन्न झाले आहे. राज्य सहकारी बँक व पणन मंडळाचे कर्ज बाजार समितीने थकविले आहे. या विविध आरोपांमुळे आपण बाजार समितीचा कारभार स्वीकारण्यास कार्यक्षम नसल्याचा ठपका पिंगळेंवर ठेवत त्यांचे सभापतिपद का काढू नये, असे नोटिसीत म्हटले आहे. याबाबत सभापती देवीदास पिंगळे यांना १६ जानेवारीपर्यंत म्हणणे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. याच दिवशी त्यावर अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा उपनिबंधकांची देवीदास पिंगळे यांना नोटीस
By admin | Updated: January 11, 2017 01:18 IST