नाशिक : शेतकरी सुकाणू समितीने शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित माल बाजार समितीत विक्रीसाठी आणण्याची अनुमती बहाल केल्यानंतर शुक्रवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्णातील ११ बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक झाल्याने त्याचा लिलाव सुरळीत होऊन भाजीपाल्याच्या दरावरही परिणाम झाला. सुमारे सहा हजार क्ंिवटल भाजीपाला मुंबई तसेच वाशी मार्केटला रवाना करण्यात आला. १ जूनपासून शेतकरी संपावर गेल्याने बाजार समित्यांमध्ये शेतमाल आणण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. सरकारचा निषेध म्हणून दूध व भाजीपाला रस्त्यावर ओतून देण्यात येत असल्यामुळे भाजीपाल्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन परिणामी दर वाढले होते. सरकारने सर्व बाजार समित्यांना संप काळात व्यवहार सुरळीत ठेवण्याचे आदेश दिल्याने बाजार समित्या सुरू असल्या तरी लिलावासाठी मालच येत नसल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले, दुसरीकडे शेतकऱ्यांचा उत्पादित माल शेतात खराब होऊ लागल्याने त्यांचाही धीर सुटल्याने गुरुवारी शेतकरी सुकाणू समितीने शेतकऱ्यांचा संप सुरूच ठेवण्याचा मात्र शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीसाठी बाजार समितीत नेण्याची मुभा दिली. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासूनच खेड्यापाड्यांतून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला बाजार समितीत दाखल झाला. शुक्रवारी सकाळी घोटी, नांदगाव, मनमाड, नाशिक, चांदवड, लासलगाव, येवला, मालेगाव, सटाणा, सिन्नर व पिंपळगाव या अकरा बाजार समित्यांमध्ये ६३८५ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. मोठ्या प्रमाणावर लिलावासाठी भाजीपाला आल्यामुळे त्यांचे दरही आटोक्यात आले. सायंकाळी व्यापाऱ्यांनी लिलावातील भाजीपाला वाशी, मुंबईकडे रवाना केला. दरम्यान, नाशिक बाजार समितीत २३४८ क्ंिवटल भाजीपाल्याची आवक झाल्यामुळे शहरात सर्वत्र भाजीपाला उपलब्ध झाला असून, सायंकाळी उपनगरांमधील भाजीबाजारात नागरिकांनी गर्दी केली होती.
जिल्ह्यात सहा हजार क्ंिवटल भाजीपाल्याची आवक
By admin | Updated: June 10, 2017 02:07 IST