सिन्नर : अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी हजर असलेल्या दोन ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बैठकीकडे पाठ फिरविल्याने पुरेसे संख्याबळ न झाल्याने तालुक्यातल्या निमगाव-सिन्नर येथील उपसरपंच छाया नवनाथ सानप यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला. निमगाव-देवपूर येथील उपसरपंच छाया सानप या विकासकामात अडथळा आणता, टॅँकरच्या फेऱ्यांबाबत फेरफार करतात, मनमानी कारभार करतात आदिंसह विविध आरोप करीत सरपंच बाळासाहेब सानप यांच्यासह ८ सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केला होता. या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक पार पडली. त्यात अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने पुरेसे मतदान न झाल्याने ठराव फेटाळण्यात आला. अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बैठक सुरू झाल्यानंतर सरपंच बाळासाहेब सानप यांनी अविश्वास ठराव मांडला. त्यास ग्रामपंचायत सदस्य जयसिंग नागरे यांनी अनुमोदन दिले. यानंतर अविश्वास प्रस्तावावर हात उंच करुन ठरावाच्या बाजूने मतदान घेण्यात आले. त्यास उपस्थितीत सहा सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. अविश्वास ठरावाच्या विरोधात कोणीही मतदान केले नाही. उपसरपंच छाया सानप यांच्यासह पाच ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थितीत राहिले. ११ ग्रामपंचायत सदस्य संख्या असणाऱ्या या ग्रामपंचायतीत अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांनी म्हणजे ८ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणे गरजेचे होते. (वार्ताहर)
उपसरपंचाविरोधात अविश्वास प्रस्ताव फेटाळला
By admin | Updated: March 19, 2016 23:43 IST