नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संस्थानचा विकास थांबला असून, त्यामुळे संस्थानचा निधीही परत गेला आहे. त्यामुळे शासनाने ही कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी बंडातात्या कराडकर यांच्यासह छावाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवृत्तिनाथ महाराज मंदिराचा विकास व्हावा, यासाठी वारकऱ्यांनी वारंवार आंदोलने केली; परंतु आजपावेतो विकास झालेला नाही. विश्वस्त, पुजारी आणि वारकऱ्यांमध्ये कोर्टात तडजोड झाल्यानंतर नवीन विश्वस्त नेमणुकीस धर्मादाय आयुक्तांनीही विलंब केला. त्यामुळे संबंधित विश्वस्तांनी यात बाधा आणण्यासाठी त्रयस्थ व्यक्तीकडून या नेमणुकीवर स्थगिती मिळविली. त्यामुळे १९९१ पासून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. संबंधित विश्वस्तांचा कार्यकाळ संपला असून, अजूनही न्यायालयाच्या आधारे कार्यकाळ बाधित ठेवला आहे. काही विश्वस्त हयात नाहीत, तर एकाने राजीनामा दिल्यामुळे केवळ दोनच विश्वस्त या संस्थानचा कारभार बघत आहेत. वारकऱ्यांच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नसून नव्या विश्वस्तांची नियुक्ती व्हायला हवी, असे निवेदनात म्हटले आहे. विश्वस्त मंडळाचा कायदेशीर कालावधी संपलेला असताना कोर्टाच्या आदेशाचे निमित्त करून सदर संस्थान वर्षानुवर्षे काही विश्वस्तांना आंदण दिले आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून नव्या विश्वस्त मंडळाची नेमणूक करावी आणि गेल्या काही वर्षांत झालेल्या गैरकारभाराची लेखापाल नेमून चौकशी करावी, तसेच संस्थानवर प्रशासक नेमावा अन्यथा छावा संघटना आणि वारकरी संप्रदाय साखळी उपोषण करेल आणि आंदोलन अधिक तीव्र करेल, असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर बंडातात्या कराडकर, पुंडलिक थेटे, नितीन सातपुते, पंडित महाराज कोल्हे, त्र्यंबकराज गायकवाड, मधुकर कासार, चंद्रकांत राजोळे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवृत्तिनाथ संस्थान कार्यकारिणी बरखास्त करा
By admin | Updated: July 15, 2014 00:46 IST