नाशिक : मोदी सरकारने पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद ठरविल्यानंतर देशभर निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीबाबत पंचांगकर्त्यांनी वर्षभरापूर्वीच वर्तविलेल्या भाकितांचीही चर्चा सर्वत्र कानी पडत आहे. व्हॉट्सअॅपवर सध्या ज्योतिषशास्त्राबद्दल शंका घेणारे संदेश फिरत असताना ज्योतिषअभ्यासकांनी पंचांगकर्त्यांचे दाखले देत शंकेखोरांना निरूत्तर करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या मंगळवारी (दि. ८) रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना चलनातून पाचशे-हजारच्या नोटा रद्द करण्याचा धक्कादायक आणि धाडसी निर्णय घोषित केला आणि एकूणच देशभर खळबळ माजली. सरकारच्या या निर्णयाचे सामान्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले तर विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत सामान्यांच्या हिताच्या विरोधी निर्णय झाल्याची भावना व्यक्त केली. गेल्या आठ दिवसांपासून नोटा बदलण्यासाठी अथवा बॅँकेत पाचशे-हजारच्या नोटांचा भरणा करण्यासाठी बॅँकांसमोर रांगा लागलेल्या असल्याने त्यातून सरकारविरोधी सूरही उमटताना दिसत आहे. नोटाबंदीच्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस सध्या व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक या माध्यमांद्वारे पडत आहे. त्यात ज्योतिषशास्त्राबद्दलही शंका घेणारे संदेश फिरत आहेत. ज्योतिषांनी या नोटाबंदीबाबत भाकिते का वर्तविली नाहीत, असे सवालही उपस्थित होत आहेत. मात्र, ज्योतिषअभ्यासकांनी आता काही पंचांगकर्त्यांनी वर्षभरापूर्वीच वर्तविलेल्या भाकितांचा दाखला देत ज्योषितशास्त्राची बदनामी करणाऱ्यांविरोधी मोहीम उघडली आहे. त्यासाठी सोलापूर येथील प्रसिद्ध दाते पंचांगकर्त्यांनी वर्तविलेले भाकीत पुढे केले जात आहे. (प्रतिनिधी)
चर्चा पंचांगकर्त्यांनी वर्तविलेल्या भाकिताचीही !
By admin | Updated: November 17, 2016 01:03 IST