नाशिक: कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याच्या वृत्तानंतर नाशिक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात याबाबतची विचारणा सुरू झाली आहे. मागील महिन्यात सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे आपत्ती विभागाकडे तब्बल १८ हजार इतके अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांत आपत्ती विभागाचे काम वाढणार असल्याचे दिसते.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले असून राज्य शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आता अशाप्रकारची मदत मिळणे दृष्टिपथात आल्यामुळे जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात अनेकांनी याबाबतची विचारणा सुरू केली आहे.
केंद्र सरकारने याबाबतचे प्रतिज्ञापत्रच सादर केल्यामुळे आर्थिक मदत मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, मात्र ही मदत नेमकी कधी मिळेल याबाबत विचारणा करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन खणखणत आहेत. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून याबाबतची अधिक माहिती जाणून घेतली आहे. माध्यमांमध्ये आर्थिम मदतीसंदर्भातील माहिती आली असली तरी शासनाकडून अद्याप कोणता आदेश निघालेला नाही. ही मोहीम जिल्ह्यात एकाच ठिकाणी की तालुकास्तरावर राबवावी याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे.
मृताच्या कुटुंबीयांना मदतीची रक्कम मिळण्यासाठी सरकारी छापील अर्ज करावा लागणार आहे. मात्र हा अर्ज कसा असेल, कुठून मिळेल याबाबतची स्पष्टता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. याचे उत्तर देण्याचे काम तूर्तास आपत्ती व्यवस्थापन विभागालाच करावे लागणार आहे. योजना कशी असेल आणि कालावधी तसेच नियोजन कसे असे याबाबतच्या कोणत्याही गाइडलाइन्स जिल्हा आपत्ती विभागाला नसल्याने नागरिकांचे समाधान करण्यासही अडचणी येत आहेत.
--कोट--
येणाऱ्या नागरिकांना माहिती देण्याचे काम आपत्ती विभागाकडून केले जात आहे. फार गर्दी होत नसली तरी विचारणा मात्र होत आहे. शासनाकडून याबाबतच्या स्पष्ट सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांचे समाधान होईल या दृष्टीने त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आलेल्या नागरिकांची नोंद ठेवली जात असून, त्यांचे संपर्क क्रमांक घेतले जात आहेत. त्यामुळे अधिकची काही माहिती नंतर मिळाली तर त्यांना कळवता येऊ शकेल.
- अर्जुन कुऱ्हाडे, आपत्ती व्यवस्थापन विभाग, प्रमुख
-