नाशिक : अपंग व्यक्तींना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी शासनातर्फे कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असली तरी आपली क्षमता आणि व्यवसायाचा आलेख लक्षात घेऊनच कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी विजय पाटील यांनी हुतात्मा स्मारक येथे झालेल्या मार्गदर्शन मेळाव्यात व्यक्त केले.अंध-अपंग तसेच मूकबधिर बांधवांना शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती व्हावी यासाठी आमदार बच्चू कडू फाउंडेशन, नाशिक यांच्यातर्फे या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देताना अर्ज करण्याची जुनी पद्धत बदलली असून, नव्या पद्धतीने अर्ज भरावा. अर्जात आपल्याला फक्त काय हवे आहे, याचाच उल्लेख आवश्यक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावरदेखील याप्रकारचे अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे पाटील यांनी यावेळी अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आमदार कडू यांना शुभेच्छा दिल्या, तसेच उपस्थित बांधवांना योजनांचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन करण्यात आले. यावेळी नंदू वराडे, शब्बीर आरशावाला, हंसराज वडघुले, शरद लभडे, अजित आव्हाड, दत्तू बोडके, प्रतीक देशमुख, धनंजय सानप यांच्यासह अंध-अपंग आणि मूकबधिर बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अपंग बांधवांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा
By admin | Updated: July 7, 2016 00:30 IST