नाशिक : जिल्हा परिषदेच्या नवीन विस्तारित प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या बंद उपाहारगृहाचा वापर जिल्हा परिषदेच्या एका मक्तेदाराने चक्क गुदामासाठी केल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या अचानक पाहणी दौऱ्यात आढळली असून, बनकर यांनी सामान्य प्रशासन विभागाला हे उपाहारगृह तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. काल (दि.२३) सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी नवीन प्रशासकीय इमारतीतील महिला व बालकल्याण, लघुपाटबंधारे विभाग, माध्यमिक विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आदि विभागांना भेटी दिल्या. त्यावेळी किरकोळ अपवाद वगळता सर्वच कर्मचारी जागेवर असल्याचे आढळून आले. इमारतीच्याच तळमजल्यावर असलेल्या बंद उपाहारगृहाची पाहणी त्यांनी केली. या उपाहारगृहाचा वापर जिल्हा परिषदेची इलेक्ट्रिक व फर्निचरची कामे घेणाऱ्या एका ठेकेदाराने चक्क फर्निचरचे साहित्य ठेवण्यासाठी व कापण्यासाठी गुदाम म्हणून केल्याचे आढळून आले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी हे उपाहारगृह तातडीने सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. उपाहारगृहाचा गुदामासाठी वापर, तसेच जिल्हा परिषदेच्या विजेचा हे फर्निचरचे साहित्य कापण्यासाठी केलेला वापर याबाबत यापूर्वीच एकाने जिल्हा परिषदेकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असल्याचे समजते. अशा प्रकारच्या अनधिकृत वीज वापरामुळे जिल्हा परिषदेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)
उपाहारगृहाचा वापर गुदामासाठी! सीईओंची झाडाझडती, सामान्य प्रशासनाला दिले आदेश
By admin | Updated: February 24, 2015 01:40 IST