दिंडोरी : अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती नसणे, अन्य विभागावरच चालढकल करणे, देण्यात येणाऱ्या माहितीत तफावत असणे यासह अन्य विविध कारणांनीच गाजलेली दिंडोरीतील आढावा बैठक आज अक्षरश: गुंडाळण्यात आली.दिंडोरी पंचायत समितीच्या विविध खात्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माळोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी याच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरवातीलाच विविध ग्रामपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना अनेक ग्रामसेवकांना माहिती देता येत नव्हती. तसेच अधिकारी यांच्याकडे असलेल्या टिपण्णीतील कामात व ग्रामसेवक सांगत असलेल्या कामकाजात तफावत होती, काही कामकाजाबाबत ग्रामसेवक इतर विभागांवर चालढकल करत असल्याचे निदर्शनास येताच मुख्य कार्यकारी अधिकारी संतप्त झाले. त्यांनी ग्रामसेवकांना तुमचे अधिकार व कर्तव्य याबाबत विचारणा केली असता त्यांना निरुत्तर व्हावे लागले. त्यांनी आपला मोर्चा गटविकास अधिकारी आर. झेड. मोहिते, विस्तार अधिकारी गोपाळ, जाधव, शेवाळे यांच्याकडे वळविला. मात्र त्यांनाही समाधानकारक माहिती देता आली नाही. अखेर बनकर यांनी थेट ग्रामपालिका अधिनियमन पुस्तक मागवून घेत साऱ्यांनाच त्यांच्या कर्तव्याचे धडे देत चांगलीच कानउघाडणी केली.गावातील कोणतीही समस्या असो तिचे निराकरण करण्याचे अधिकार हे ग्रामसेवकांचे कर्तव्य असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. घरकुल योजनेच्या कामकाजातही विस्कळीतपणा असल्याने अधिकाऱ्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. अनेक ठिकाणी शौचालये बांधले आहे का असा सवाल बनकर यांनी केला असता ग्रामसेवकांची त्रेधातिरपट उडाली. यावेळी बनकर यांनी विस्तार अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याबरोबरच काही ग्रामसेवकांचा पगार रोखण्याचेही आदेश दिले. ग्रामसेवक जर नियमित त्या गावात राहिले, तर कोणतेही काम कधीच अडणार नाही, असे बनकर यांनी सांगितले. तर विस्तार अधिकारी यांना तुम्हालाच शासनाच्या योजना, शासन निर्णय माहिती नसेल तर ग्रामसेवकांकडून काय अपेक्षा करायची असा सवाल करून कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे फर्मान सोडले. त्याचबरोबरच पुन्हा आढावा बैठक घेण्याबरोबरच थेट गावात जाऊनच पाहणी करणार असल्याचे बनकर यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामसेवकांकडून आढावा घेण्यातच साडेसहा वाजल्याने अखेर आरोग्य विभागाचा थोडक्यात आढावा घेत बैठक गुंडाळण्यात आली. (वार्ताहर)
दिंडोरीतील बैठक गुंडाळली
By admin | Updated: July 25, 2014 00:36 IST