पंचवटी : भक्तीने प्रेम निर्माण होत असते. जशी भक्ती तसे फळ मिळते. काही लोक प्रचिती आल्यानंतर भक्ती बंद करतात तर काही भाविक भक्तीत सातत्य ठेवतात. भक्ती केली तर अनुभव मिळेल. कोणाचेही वाईट होऊ नये ही भक्तीमार्गाची मुख्य शिकवण आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी जनम संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे दोनदिवसीय समस्या मार्गदर्शन, प्रवचन व दर्शन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सोहळ्यास नाशिकसह अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील हजारो भक्तांनी हजेरी लावली. यावेळी भक्तांना मार्गदर्शन करताना स्वामी पुढे म्हणाले की, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, कोणाबद्दल वाईट विचार करू नका, प्रत्येकाने परमेश्वराचे नामस्मरण करावे मात्र त्यात शुद्धता असावी. नामस्मरण करताना कोणाबद्दल वाईट विचार मनात येता कामा नये. खाण्याच्या पथ्यासोबत बोलण्याचे पथ्यजर पाळले तर जीवन सुखी होते.जीवनात दोन मार्ग आहेत. एक प्रपंच आणि दुसरा परमार्थ. प्रपंचात आनंदी जीवन जगायचे असेल तर परमार्थ करा. जीवनातला कमीपणा काढून टाका व्यक्तीने स्वत:ला कमी लेखू नये. नावात सामर्थ्य निर्माण होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. देव प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक माणसातदेखील देव असल्याचे सांगून स्वामींनी यावेळी अंधश्रद्धेवर प्रहार केले. भानामती, करणी केलेली आहे असे मनातून काढून टाका, हे थोतांड आहे. यात काही सत्यता नसून ही एक अंधश्रद्धा आहे. जीवनातून अंधश्रद्धा समूळ नष्ट करा, असेही ते शेवटी म्हणाले.
समस्यांचे निराकरण करण्यासाठी भक्ती करा : नरेंद्राचार्य महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:25 IST