संकेत शुक्ल/नाशिक : आज राज्यासह देशात सुलतानी आणि आसमानी संकटे कोसळत आहेत. समानतेच्या संधी नाकारल्या जात आहेत. शेतकरी संकटात आहे. त्या सर्वांना समानतेचे चांगले दिवस यावे, यासाठी प्रभू रामांना साकडे घातले. संविधानात श्रीरामांचा उल्लेख असल्याने हातात संविधानाची प्रत घेऊन रामाचे दर्शन घेतल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
राम नवमीनिमित्त रविवारी (दि. ६) काळाराम मंदिर येथे दर्शनासाठी आले असता, माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खा. शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी दर्शनाला आलो आहे, असे सांगत सपकाळ यांनी राज्यासह केंद्राच्या धोरणांवर टीका केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केल्यामुळे त्यावर पडसाद उमटले असून त्याबाबत विचारले असता, आपण त्यांच्या राज्यकारभाराला औरंबजेबाची उपमा दिली असून, त्यांच्या कार्यकाळात होत असलेल्या घटनांमुळेच ती दिल्याचे सांगत आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही सपकाळ म्हणाले. अजित पवार यांच्याबद्दल मी सत्य बोललो.
त्यांना राग आल्यानेच त्यांनी माझ्यावर वक्तव्य केले. राज्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. मात्र, या आधीचीच मदत त्यांना मिळालेली नाही. अशा पद्धतीने कारभार सुरू असल्याने राज्यातील सर्वच घटक नाराज आहेत. सगळ्यांना समान न्यायाने हक्क मिळावेत यासाठी संविधानाला स्मरून आमचा लढा सुरू असल्याचे सपकाळ म्हणाले. मूळ संविधानात मूळ श्रीरामाचा फोटो होता, आताही तो असल्याचे त्यांनी सांगितले.संजय राऊत आले अन् भेटून गेले...
सपकाळ माध्यमांशी संवाद साधत असताना त्याच दरम्यान खा. संजय राऊत काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. दर्शन झाल्यानंतर राऊत यांनी सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट घेत काळाराम संस्थानच्या कार्यालयात भेट दिली. सपकाळ गेल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.