नाशिकरोड : विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील नगररचना विभाग कार्यालयात नाशिक शहराच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यावर दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर मंगळवारपासून नियोजन समितीसमोर सुनावणीस प्रारंभ झाला. मखमलाबाद व म्हसरूळ येथील २३२ हरकतींवर आज पहिल्या दिवशी सुनावणी झाली.नाशिक शहराचा प्रारूप सुधारित विकास आराखडा नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी तीन महिन्यांपूर्वी सादर केल्यानंतर हरकती व सूचनांसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. प्रारूप सुधारित विकास आराखड्यावर २१४९ हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या.दाखल झालेल्या हरकती व सूचनांच्या सुनावणीला आज मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, ९ सप्टेंबरपर्यंत सुनावणी होणार आहे. नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते, नियोजन समितीचे सदस्य अशोक मोरवा, डॉ. संजयकुमार सोनार या तीन सदस्यीय नियोजन समितीसमोर मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून सुनावणीस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मखमलाबाद, म्हसरूळ भागातील २३२ हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या प्रक्रियेमध्ये खासगी जागेवर टाकण्यात आलेले आरक्षण, जागा, शेतीमधून प्रस्तावित दाखविलेला रस्ता, वेगवेगळे टाकलेले आरक्षण यावर घेतलेल्या हरकतींवर संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. यावेळी शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आदिंनी घेतलेल्या हरकतीवरदेखील सुनावणी झाली. हरकतीवरील सुनावणी ९ सप्टेंबरपर्यंत असून, प्रत्येक दिवशी विशिष्ट भागातीलच हरकती, सूचनांवर सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)हरकतींचा विचार करणार
सुधारित प्रारूप विकास आराखड्यावर घेण्यात आलेल्या हरकती, सूचना व रहिवाशांचे म्हणणे ऐकून, समजून घेतले जाईल. जास्तीत जास्त मिळकतधारक बाधित होणार नाही यांची काळजी घेऊन शासनाला अंतिम अहवाल सादर करू, असे नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी सांगितले.