लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : गोव्याचे मुख्यमंत्री नातेवाईक तसेच स्वत: लष्करात कर्नल असल्याची बतावणी करून गोव्यातील खाणी तसेच आर्मीमध्ये उच्चपदावर नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना सुमारे साडेचौदा लाख रुपयांना गंडा घालून पुण्याला पलायन केलेल्या रूपाली सिद्धेश्वर शिरुरे (रा. वृषाली अपार्टमेंट, गजपंथ स्टॉपजवळ, म्हसरूळ) या महिलेस म्हसरूळ पोलिसांनी रविवारी (दि़११) अटक केली़ म्हसरूळ पोलीस ठाण्यात १७ मे २०१७ रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून शिरुरे नाशिक शहरातून फरार झाली होती़म्हसरूळ परिसरातील बालाजी सोसायटीतील रहिवासी सोपान विठ्ठल ठाकरे या युवकाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार खासगी शिकवणी घेणाऱ्या शिरुरे या महिलेची डिसेंबर २०१६ मध्ये ओळख झाली़ तिने शैक्षणिक माहिती घेऊन गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे नातेवाईक असून, लष्कर तसेच खाण विभागात ओळख असून नोकरीचे आमिष दाखविले़ इंजिनिअर असलेल्या ठाकरेने ही बाब मित्र प्रकाश सुधाकर जगताप (रा. लासलगाव, ता. निफाड) यास सांगितली़ या दोघांनी महिलेच्या अॅक्सिस बँकेच्या अहमदनगर शाखेत आरटीजीएसद्वारे एक लाख रुपये जमा केले़ यानंतर परीक्षेच्या नावाखाली तीन हजार ६०० रुपये घेतले़संशयित शिरुरे हिने या कालावधीत यशवंत खोलमकर, संध्या म्हस्के, भाग्यश्री म्हस्के, विनोद वायकर, तुषार पवार, जगदीश डहाळे, छाया डहाळे, बाळासाहेब पवार,अक्षय सोनवणे, संतोष लोहार, किरण हिरे, सुरेश सावंत, अमित भोईल, विजय खोलमकर या बेरोजगारांची १४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली़ विशेष म्हणजे म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरुरे फरार झाली होती़ या महिलेने अनेक बेरोजगारांची फसवणूक केल्याची शक्यता आहे़ म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक बेडवाल, पोलीस शिपाई रेहेरे, महिला पोलीस शिपाई सुप्रिया कातोरे यांनी ही कारवाई केली़
तोतया महिला लष्करी अधिकाऱ्यास पुण्याहून अटक
By admin | Updated: June 11, 2017 21:14 IST