कसबे सुकेणे : नाशिक जिल्हा महानुभाव समिती व दत्त मंदिर संस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री सुखदानी स्थानवंदन आणि समाजप्रबोधन पदयात्रेचे प्रस्थान श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथून नुकतेच झाले.मौजे सुकेणे येथून जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीजवळील वनदेव येथे या पदयात्रेचा भेट काळ असून, आंबे वडगाव, पाचोरा, भडगाव, कनाशी, वाघळी, सायगव्हान, करंजखेड, कन्नड, हतनूर, वेरूळ, माटेगाव मार्गे लासूर दत्त मंदिरात समारोप होणार आहे. चौदा दिवसांची ही पदयात्रा जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यातील भगवान श्री चक्रधरस्वामींच्या चरणांकित स्थानांना, मंदिरे, महानुभाव आश्रमांना भेटी देऊन सत्य, अहिंसा, शांती, समता, महानुभावांचे साहित्य, व्यसनमुक्ती यावर गावोगावी प्रबोधन करणार असल्याची माहिती अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष परमपूज्य मनोहरशास्त्री सुकेणेकर व संयोजक परमपूज्य गोपीराजशास्त्री सुकेणेकर यांनी दिली.महंत सुकेणेकर बाबा, पूज्य मनोहरशास्त्री सुकेणेकर, पूज्य अर्जुनराज सुकेणेकर, पूज्य बाळकृष्णराज सुकेणेकर यांच्या हस्ते सुकेणे दत्त मंदिरात मूर्तीस विडा अवसर करण्यात आला, तर मौजे सुकेणेच्या सरपंच सुरेखा विलास गडाख व विलास साहेबराव गडाख यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा महानुभाव समितीचे वामन आवारे, बाळासाहेब टर्ले व मौजे सुकेणे ग्रामस्थ, पदयात्रेकरू भाविक उपस्थित होते. (वार्ताहर)
समाजप्रबोधन पदयात्रेचे प्रस्थान
By admin | Updated: November 24, 2015 23:24 IST