प्रभू श्रीरामांनी येथे सहस्रलिंगाची स्थापना केली. या सहस्रलिंग देवस्थानाचे वैकुंठ वाशी हभप वामनानंदजी महाराजांनी १९६२ साली जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. सर्व बाजूंनी जंगलाने वेढलेल्या या देवस्थानाचा जीर्णोद्धारकामी रामेश्वर गाव व पंचक्रोशीतील भाविकांनी मदत केली. येथे महादेवाचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. या देवस्थानावर भक्तनिवास, सभामंडप आदी सुविधा निर्माण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना धार्मिक कार्य, लग्न समारंभ आदींसाठी चांगली सोय झाली आहे. या पवित्र क्षेत्रावर महाशिवरात्र सप्ताहाबरोबर श्रावण महिन्यात नियमितपणे श्री एकनाथी भागवत पारायण केले जाते.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेलेला असतो. त्याचप्रमाणे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचा पारायण सप्ताह होतो.
देवळा तालुक्यात पर्यटन क्षेत्र अद्याप फारसे विकसित झालेले नाही; परंतु तालुक्यात रामेश्वर येथील किशोर सागर धरण परिसर, सहस्रलिंग देवस्थान आजूबाजूला असलेले पर्वतात विकसित होणारे घनदाट जंगल व तेथे आढळणारे विविध वन्यप्राणी पर्यटकांना आकर्षून घेत आहेत.
किशोर सागर धरण परिसरात नुकतेच निर्माण केलेले भव्य उद्यान, तसेच धरणात प्रगतिपथावर असलेले बोट क्लबचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, पर्वतांनी वेढलेला व निसर्गसौंदर्याने नटलेला हा परिसर तालुक्यातील पर्यटनाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे.
(१२ देवळा टेंपल)
सहस्त्र लिंग शिवमंदीर.