निफाड : तालुक्यात डेंग्यूचे २० रुग्ण आढळले असून या पार्श्वभूमीवर निफाड पंचायत समितीत शनिवारी बत्तीस वर्षात प्रथमच पंचायत समितीचे पदाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक होऊन तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांची वाढत चाललेली संख्या, दूषित पाणी तसेच दिंडोरी तास येथील बालकाच्या मृत्यू प्रकरणी वादळी चर्चा झाली.निफाड पंचायत समितीच्या झालेल्या या बैठकीस निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड, गटविकास अधिकारी वैशाली रसाळ पं.स. सदस्य प्रकाश पाटील, बाळू हिले, तालुका वैद्यकीय अधिकारी चव्हाण, दिंडोरीतासचे सरपंच संदीप तासकर यांच्यासह तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दिंडोरीतास येथील प्रसाद लहांगे बालकाचा झालेल्या मृत्यू प्रकरणाबद्दल सरपंच संदीप तासकर यांनी वैद्यकीय अधिकारी आणि नर्स यांच्या विसंवादातून बालकाला आपला जीव गमवावा लागल्याचे सांगत दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली.तर निफाड तालुक्यात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तालुक्यात डेंग्यूचा कहर वाढत आहे. आरोग्य यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगत कर्मचारीवर्गाला धारेवर धरले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले की, तालुक्यात डेंग्यूचे जवळपास वीस रुग्ण आहेत, तर काही रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार करतात. तेव्हा त्या दवाखान्याच्या डॉक्टरचे कर्तव्य आहे की, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला डेंग्यू रुग्णाबद्दल सूचित करणे परंतु सदर डॉक्टर तशी माहिती देत नाही़ यापुढे डेंग्यूबाबत डॉक्टर वा दवाखान्याने सूचित केले नाही तर संबंधित डॉक्टरला आरोग्य विभागाकडून नोटीस काढण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला. याप्रसंगी गटविकास आधिकारी वैशाली रसाळ म्हणाल्या की, आरोग्य संदर्भातील तक्रारी वाढल्यामुळे आजची बैठक बोलविली आहे. आरोग्य विभाग आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय असला पाहिजे़तालुक्यात पाणी दूषित असल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात. या बाबतीत गावातील पाणी नमुने घेऊन ग्रामपंचायतीने त्या संदर्भात आरोग्य विभागाला कळवावे. त्यानंतरही दखल घेतली नाही तर पंचायत समिती त्याबाबत कारवाई करेल. (वार्ताहर)
निफाड तालुक्यात डेंग्यूचा कहर
By admin | Updated: November 13, 2016 22:43 IST