नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे स्थानकांवर अनधिकृत विक्रेते निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ प्रवाशांना विकत असून, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे प्रबंधक एम.बी. सक्सेना यांना अधिकृत स्टॉलधारक, खाद्यपदार्थ विक्रेते व रेल्वे ठेका मजदूर युनियनतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वेस्थानकावर अधिकृत स्टॉलधारक व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रशासनाकडून त्रास दिला जात आहे. रेल्वेस्थानकावर अनधिकृत हॉकर्स, खाद्यपदार्थ विक्रेते निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ प्रवाशांना विकत आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे संबंधित अधिकारी व पोलीस दुर्लक्ष करीत आहे. सिंहस्थात होणारी गर्दी लक्षात घेता अनधिकृत विक्रेत्यांमुळे भाविकांना मोठा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अनधिकृत विक्रेत्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रेल्वे मजदूर युनियनचे आनंद गांगुर्डे, रेल्वे ठेका मजदूर युनियनचे सखाराम साठे, वसंत मोरे, उत्तम मुंढे, पिंटू औशिकर, राजू वाढवणे, संतोष थोरात, केशव मुंढे आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
अनधिकृत विक्रेत्यांच्या बंदोबस्ताची मागणी
By admin | Updated: September 21, 2015 23:21 IST