कंधाणे - बागलाण तालुका सध्या दुष्काळाच्या छायेत असून यंदा कमी पावसामुळे चारा-पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. प्रशासनाकडून शेतीसिंचनासाठी अदयाप आरम नदीत पाण्याचे आवर्तन न सोडल्याने या भागातील फळ बागायती क्षेत्राच्या रब्बी हंगामाचे नियोजन चुकत आहे. त्यामुळे केळझर धरणातुन शेतीसिंचनासाठी पाण्याचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.बागलाण तालुक्यावर यंदा पावसाने वक्र दृष्टि केल्याने खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. त्यामुळे बळीराजावर आर्थिक संकट कोसळले आहे. कमी पर्जन्यमानामुळे पाणी, जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आजही ब-याच गावांना एक दिवसाआड अपु-या स्वरूपात पाणी पुरवठा केला जात असल्याने स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. केळझर धरणाच्या लाभाक्षेत्रातील गावातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून धरणातील पाण्यावर कंधाणे, निकवेल, चौंधाणे, मुंजवाड, सटाणा, आराई गावातील फळबागायती शेतीक्षेत्राचे रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून असते. दरवर्षी आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस शेतीसाठी पाण्याचे ठरणारे नियोजन यंदाच्या वर्षी उशिराने होत असल्याने बळीराजाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून अदयाप कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर पसरला आहे . शेतीसिंचनासाठी सोडण्यात येणा-या पाण्यामुळे शेतीसिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या केळझर धरणातून शेतीसिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडून दुष्काळाने होरपळणाºया बळीराजाला दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेस च्या पदधिका-यांनी केली आहे राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, विद्यार्थी कांग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल बच्छाव, राजेंद्र सावकार उपस्थित होते
केळझर धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 15:58 IST
शेतीसिंचन : राष्ट्रवादीचे जिल्हाधिका-यांना निवेदन
केळझर धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी
ठळक मुद्देकमी पर्जन्यमानामुळे पाणी, जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.