नाशिक : कोविड लसीकरण कामाचा मोबदला त्वरित सुरू करा अन्यथा आशा व गटप्रवर्तक महिला हे काम करण्यास नकार देतील, असा इशारा आशा व गटप्रवर्तक संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
भारत सरकारने कोविडचे काम करणाऱ्या आशा, गटप्रवर्तक व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबदला देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत नसल्याने याविरुद्ध लॉकडाऊन काळातही आशा व गटप्रवर्तक महिलांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय अधिकाऱ्यांनी सक्तीने काम करण्यास सांगितले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांकडून केव्हाही आशा व गटप्रवर्तक महिलांना काहीही काम सांगितले जात आहे, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आयटक कामगार संघटनेने निवेदन पाठवले आहे. त्यांनी या निवेदनाची त्वरित दखल घेऊन निवेदन शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठवले आहे. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. लसीकरण कामासाठीचा मोबदला आशा व गटप्रवर्तक महिलांना किती देणार? हे अजूनही शासनाने घोषित केलेले नाही. त्यांच्याकडून हे काम फुकट करून घेतले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास खात्याकडून १ एप्रिलपासून प्रोत्साहन भत्ता दरमहा एक हजार रुपये घोषित करण्यात आला. परंतु, संपूर्ण राज्यामध्ये बहुसंख्य आशा व गटप्रवर्तक महिलांना एकाच महिन्याचा मोबदला मिळालेला आहे. नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायतीमार्फत एक हजार रुपये देण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणी राजू देसले यांनी निवेदनातून केली आहे.