पंचवटी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या साडेतीन महिन्यांपासून मंदिर, मठ व आश्रम बंद केले असल्याने शेकडो भाविकांना देवदर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. नाशिक हे पवित्र तीर्थस्थळ आहे. सध्याची परिस्थिती पाहता आगामी श्रावण महिना लक्षात घेऊन विविध प्रकारच्या पूजा, विधी, होम हवन करण्यासाठी भाविक उत्सुक असून, त्या पार्श्वभूमीवर श्रावणात मंदिरे सुरू करावे, अशी मागणी विरक्त साधू समाज मंडळातर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.शहरातील सर्व व्यवसाय सुरू करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने सलून आणि हॉटेल व्यवसाय सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत श्रावण महिना सुरू होत असून, श्रावणात सर्वसामान्य लोकांची व्रते, उपवास आणि अनुष्ठान सुरू होतील. मंदिर तसेच आश्रमात धार्मिक कार्यक्र म होमहवन उपासना होतात. मंदिर व आश्रम सुरू झाल्यास त्या अनुषंगाने संबंधित वस्तू आणि सेवा व्यापारातदेखील उलाढाल होण्यासाठी मदत होईल, यावर निर्भर असलेले अनेक छोटे-मोठे व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागेल. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरत नियम पाळले जात आहे व यापुढे पाळले जाईल, असे पत्रकात म्हटले आहे. यावेळी महंत भक्तिचरणदास महाराज, सतीश शुक्ल आदी उपस्थित होते.
मठ-मंदिरे खुली करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 02:00 IST