मालेगाव : तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी प्रदेश कॉँग्रेसचे सदस्य डॉ.तुषार शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, मालेगाव तालुक्यात पाऊस झालेला नसल्याने खरिपाच्या पेरण्याही झालेल्या नाहीत. काही भागात केवळ रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; परंतु त्यानंतर पाऊसच झालेला नसल्याने त्याही वाया गेल्या आहेत. त्यामुळे बी-बियाणे यांचा खर्च वाया गेला आहे. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकरी हवालदिल झाल्याने वीजदेयके भरू शकत नाही, शासनाने शेतकऱ्यांचे वीजदेयके माफ करावीत. शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती देण्यात यावी. वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाई असल्याने तेथे पाण्याचे टॅँकर सुरू करावेत. निवेदनावर तालुका कॉँग्रेस अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, सुकदेव देवरे, संतोष शेवाळे, सतीश पगार, दत्तू खैरनार, संगीता बच्छाव आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. ब्राह्मणगाव : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी बागलाण तालुक्यात पाऊस झालेला नसल्याने बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.गारपिटीमुळे बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाळा चांगला होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र तब्बल दीड महिना उलटला तरी या भागात पाऊसच झालेला नाही. परिणामी बागलाण तालुक्यात अद्याप खरिपाच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. शेतकरी व शेतमजूर यांना रोजगार नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. शासनाने बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रिपाइंचे तालुका उपाध्यक्ष बापुराज खरे, अण्णा जगताप, कैलास खरे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
मालेगाव, बागलाण दुष्काळी जाहीर करण्याची मागणी
By admin | Updated: July 24, 2014 00:58 IST