मालेगाव कॅम्प : येथील महानगरपालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व तिसरा महाज पक्षावर भ्रष्टाचाराचे विविध आरोप करत मनपा जेव्हापासून अस्तित्वात आली तेव्हापासून मनपाचे आर्थिक लेखापरीक्षण (आॅडिट) करण्यात यावे, अशी मागणी येथील मनपा जनता दल (धर्मनिरपेक्ष) गटनेते बुलंद एक्बाल यांनी पत्रकार परिषदेत केली. मालेगाव मनपात सत्तारूढ कॉँग्रेस व तिसरा महाज यांच्याकडून अनेक कायदे धाब्यावर बसवून व नियमांचे उल्लंघन करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला जात आहे. नवीन बसस्थानकालगत स्कायवॉकची निर्मिती करण्याचे नियोजित असताना तो विषय डावलण्यात आला. त्यामुळे यासंदर्भात पक्षाचे सचिव मोहंमद मुस्तकीम यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच याप्रकरणी मनपा प्रशासन व स्थायी समिती सभापती यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची परवानगी विभागीय आयुक्तांकडे मागितली असल्याचे एक्बाल यांनी सांगितले. तसेच मालेगाव महानगरपालिका शहरातील स्वच्छतेवर वार्षिक २५ कोटी ८९ लक्ष ३० हजार ७८० रुपये खर्च करत असताना शहरातील स्वच्छतेत मात्र सुधारणा होत नाही. उलट अस्वच्छतेत भर पडत आहे. जुने ७०० व नवीन कंत्राटी ४०० सफाई कर्मचारी नेमूनही शहरातील स्वच्छतेचा ठेका वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला. शहरात कचरा उचलण्यासाठी ४० नवीन घंटागाड्या व ४० नवीन ट्रॅक्टर आवश्यक असताना एकही तसे नवीन वाहन उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे ठेकेदाराचे सर्व काम रद्द करण्यात यावे व कायदेशीररीत्या काम करण्यासाठी दंडाच्या स्वरूपात मक्तेदाराकडून खर्च वसूल करण्यात यावा, अशी आपली मागणी आहे. अस्वच्छतेमुळे शहरात कायम विविध रोगांची साथ असून, त्यास प्रामुख्याने लहान बालके बळी पडत असल्याचे एक्बाल यांनी सांगितले. शहरातील प्रमुख रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम रिलायन्स कंपनीने केले. खोदलेले रस्ते दुरस्त करण्यासाठी कंपनीकडून दोन कोटी ५६ लक्ष १३ हजार ८७६ रुपये वसूल करण्यात आले. मात्र ही रस्ता दुरुस्ती नावापुरती असून, त्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांनी केला. एकूणच शहरातील स्कायवॉकप्रकरण, साफसफाईचा ठेका असो वा रिलायन्स कंपनीकडून रस्तेदुरुस्तीच्या नावाने वसूल केलेली रक्कम अशा विविध प्रकरणात मनपातील सत्तारूढ कॉँग्रेस व तिसरा महाजतर्फे भ्रष्टाचार वाढत चालला आहे. शहरातील विविध विकासकामांपैकी काही कामे बंद झाली आहेत, तर काही लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे मनपा स्थापन झाल्यापासून मनपाचे आर्थिक लेखापरीक्षण करावे, अशी मागणी एक्बाल यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी केली. यावेळी नगरसेवक सलीम गडबड, आरिफ हुसैन, जावेद अहमद, जलील अहमद, महमंद मुस्तकिम, साकीर शेख, सचिन पिंगळे आदि उपस्थित होते.
मालेगाव मनपाच्या लेखापरीक्षणाची मागणी
By admin | Updated: July 14, 2014 00:35 IST