बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST2021-01-13T04:35:39+5:302021-01-13T04:35:39+5:30
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील देवगाव येथे नाशिक पूर्व वन विभागाने उभारलेले उत्तर महाराष्ट्रातील बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्र (कॉमन फॅसिलिटी ...

बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील देवगाव येथे नाशिक पूर्व वन विभागाने उभारलेले उत्तर महाराष्ट्रातील बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) आदिवासी कुशल, अकुशल कारागिरांसाठी उपलब्ध झाले आहे. या केंद्राचे लोकार्पण राज्य बांबू विकास मंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के. रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांमधील पारंपरिक कलेला यांत्रिक बळ मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
नाशिक पूर्व वन विभागातील उंबरठाण वन परिक्षेत्रातील मौजे देवगावमध्ये हे केंद्र उभारण्यात आले आहे. या सामूहिक सुविधा केंद्रातून आदिवासींना बांबूचे विविध दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आकर्षक अशा वस्तूंचे उत्पादन होण्यास मदत होणार आहे. या केंद्रात बांबूपासून विविध शोभिवंत व कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामग्रीमध्ये फोर साइड प्लेनर कटर, डिस्क सॅनडर, नॉट रिमोव्हर, पॉलिश मशीन आदी उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्थानिक कारागिरांना या साधनसामग्रीच्या साहाय्याने वस्तू बनविण्याकरिता पुढील सोमवारपासून (दि. १८) तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या चमूकडून प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती यावेळी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी यावेळी दिली. याप्रसंगी बांबू विकास मंडळ, नाशिकचे विभागीय समन्वयक भास्कर पवार, सुरगाणा उपविभागाचे सहायक वनसंरक्षक हेमंत शेवाळे, वनक्षेत्रपाल संदीप जोपळे आदी उपस्थित हाेते.