नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा फैसला येत्या आठ दिवसांत करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कॉँग्रेसचे निरीक्षक उल्हास पाटील नाशिकला येऊन मत अजमावणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. कॉँग्रेसमधील एक गट आघाडीच्या विषयाशी असहमत असल्याने त्यांचे शंका निरसन करून फैसला होणार आहे. दरम्यान, मंगळवारपासून (दि.८) अर्ज वितरण सुरू करण्यात येणार आहे.महापलिकेच्या निवडणुकी-संदर्भात कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यादृष्टीने कॉँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शरद अहेर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसशी आघाडी करण्यासंदर्भात बैठक घेतली. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक उत्तमराव कांबळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आघाडी करण्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे एकमत झाले, परंतु कॉँग्रेसमध्ये एका गटाने नाराजीचा सूर आळवला विशेषत: सन्मानजनक जागा वाटप होत असेल तरच आघाडी करावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर मूठभर पदाधिकारी कसा काय निर्णय घेतात, असा सवाल करण्यात आला. त्यामुळे आता पक्ष निरीक्षक उल्हास पाटील यांना पाचारण करण्यात आले असून, ते कार्यकर्त्यांची बैठक घेतील व विविध शंकांचे समाधान करतील. त्यानंतर तसा अहवाल प्रदेश कार्यालयाला पाठविण्यात येईल आणि श्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेते आघाडी करण्यास अनुकूल असल्याचे शरद अहेर यांनी सांगितले. तथापि, कॉँगे्रसमध्ये काही कार्यकर्त्यांना शंका आहेत, त्याचे निरसन करून आघाडीचा निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. सध्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार जयंत जाधव हे संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.
आघाडीचा फैसला आठ दिवसांत
By admin | Updated: November 8, 2016 01:42 IST