औरंगाबाद : महापालिकेची २० डिसेंबरची सभा आर्थिक उलाढालींच्या प्रस्तावांमुळे नियोजन (प्लॅन) करून उधळल्यामुळे आज महापौरांनी गुपचूप एका बैठकीचे आयोजन केले. उद्या सोमवारी २२ डिसेंबर रोजी तहकूब सभा होणार असून, तासाभरात ती संपविण्याबाबत महापौर कला ओझा यांच्या निवासस्थानी निर्णय सर्वपक्षीय बैठकीत झाला. गोडीगुलाबीने सभा संपविणे आणि वादग्रस्त विषय व इतिवृत्त रद्द करण्याप्रकरणी महापौरांसह उपमहापौर संजय जोशी, गटनेते मीर हिदायत अली, सभागृह नेते किशोर नागरे, गटनेते गजानन बारवाल, संजय केणेकर यांच्यात एकवाक्यता झाली. यावेळी आयुक्त पी. एम. महाजन, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्दीकी, मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांची उपस्थिती होती. आयुक्त आणि महिला नगरसेविकांमध्ये ‘संसार’ या शब्दावरून शनिवारच्या सभेत वाद झाला. त्यामुळे सभा रद्द करण्यात आली. पालिकेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही पदाधिकाऱ्यांनीच आयुक्तांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून दिली होती. त्यामुळे ते तासभर अॅण्टी चेंबरमध्ये बसून होते. बहुतांश नगरसेवकांच्या वॉर्डात विकासकामे सुरू आहेत. मात्र, विकासकामे होत नसल्याची ओरड करीत काही नगरसेवकांनी सभेत शनिवारी धुडगूस घालून विषयपत्रिका सुरू करण्याची वेळच येऊ दिली नाही. त्याच पत्रिकेवर सोमवारची सभा होणार आहे. शहरात पथदिवे बंद आहेत, रस्ते उखडलेले आहेत. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपट्टी वसुलीसाठी नेमलेले एजंट गुंडगिरी करीत आहेत. पाणीपट्टी वसुलीला काही महिने स्थगिती देण्याच्या विषयावर चर्चा होणार आहे.
वादग्रस्त ठराव रद्द करण्याचा निर्णय
By admin | Updated: December 22, 2014 01:20 IST