नाशिक : विवाहास अवघे दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत नाही तोच नांदविण्यास नकार देऊन फारकतीसाठी पत्नीला जाळून मारणाऱ्या भाऊराव रामनाथ गुळवे (रा.दोडी बु. शिवार, रामोशीवाडा, ता़ सिन्नर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रतिभा चौहान यांनी मंगळवारी (दि़१) मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक शिवारातील रामोशीवाडा येथे राहणाऱ्या माया दशरथ जेडघुले (१८) हिचा १३ मे २०१३ रोजी तेथील भाऊराव रामनाथ गुळवे (२३, रा़सदर) याच्याशी विवाह झाला होता़ विवाहास दोन महिने होत नाही तोच भाऊराव व त्याच्या आईने मायाचा शारीरिक व मानसिक छळ सुरू करून घटस्फोटाची मागणी करीत होता़ १३ जुलै २०१३ रोजी माया नांदावयास आली असता आरोपी भाऊरावने ‘तू नांदायला का आली, मला घटस्फोट दे’, असे सांगितले. मात्र, तिने नकार दिल्याने त्याने राग येऊन मायाच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले़ या अवस्थेतच ती शेजारी राहणाऱ्या बहिणीकडे छाया गणेश गुळवेकडे पळत गेली होती़ तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मायाचा मृत्यू झाला़ मायाने मृत्यूपूर्वी पोलीस व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे पतीने जाळल्याचा जबाब दिला होता़ सरकारी वकील सुलभा सांगळे यांनी न्यायालयात आठ साक्षीदार तपासून मायाचा मृत्यूपूर्व जबाब सादर केला़ त्यावरून न्यायालयाने आरोपी भाऊराव गुळवे यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ (प्रतिनिधी)
पत्नीस जाळून मारणाऱ्या पतीस मरेपर्यंत जन्मठेप
By admin | Updated: September 1, 2015 23:25 IST