नाशिक : पंचवटी परिसरातील महामार्गाजवळ असलेल्या धात्रक फाटा परिसरात रविवारी सकाळी पाच ते सहा वानरांचा समूह दाखल झाला. ही वानरसेना परिसरातील या घरावरून त्या घरावर, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होती. या दरम्यान, काही मोकाट कुत्र्यांनी या वानरांचा पाठलाग केला. आपला जीव वाचविण्यासाठी एक वानर विद्युत रोहित्रावर चढले आणि विजेच्या धक्क्याने त्याला जीव गमवावा लागला.वानराच्या या दुर्दैवी मृत्यूने परिसरातील रहिवासी हळहळले. इतक्या वेळ माकडचाळे करणारे हे वानर क्षणातच गतप्राण झाल्याने त्याचा मृत्यू रहिवाशांना चटका लावून गेला. परिसरात बघ्यांची गर्दी झाली. त्यानंतर रहिवाशांनी घटनेची माहिती तत्काळ महावितरण कार्यालयाला, तसेच सर्प व प्राणिमित्र माणिक कुमावत यांना कळविली. घटनास्थळी दाखल झालेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा तत्काळ खंडित केला. त्यानंतर परिसरातील कैलास निकम, योगेश बागुल, शेलार, गिते या रहिवाशांनी वीज कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृत वानराला विद्युत रोहित्रावरून खाली आणले. त्यानंतर काही महिलांनी मृत वानराच्या शरीरावर पुष्पहार अर्पण केले. नवीन कापड मृतदेहावर टाकले.
मृत्यू वानराचा; गहिवर माणुसकीचा...
By admin | Updated: October 4, 2015 22:23 IST