नाशिक : जिल्हा रुग्णालय आवारातील नवीन इमारतीसाठी बांधकाम सुरू केलेल्या खड्डयात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१) सकाळी उघडकीस आली़ दरम्यान या वृद्धाची ओळख पटलेली नसून पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून या घटनेची सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
जिल्हा रुग्णालय आवारात नवीन इमारतीचे काम सुरू असून या ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत़ या खड्डयांमध्ये सकाळी साधारणत: ६० ते ६५ वय असलेल्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला़ सकाळी या ठिकाणाहून जाणाऱ्या कामगारांना हा मृतदेह दिसला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या ठिकाणाहून जात असताना अंधार असल्याने तो खड्डयात पडल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे़ विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वीच या खड्डयांमध्ये एक वृद्ध पडल्याने गंभीर जखमी झाला होता़ मात्र, त्यावेळी पाऊस नसल्याने खड्डे कोरडे होते, तसेच अग्निशशमन विभागाने हा प्रकार उघडकीस आल्याने या वृद्धास बाहेर काढले होते़
रात्रीच्या अंधारात जात असताना पाणी साचलेल्या या खड्डयांमध्ये पडून या वृद्धाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात असून या घटनेची सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, या वृद्धाची ओळख पटलेली नाही़