ओझर : येथील मारुती मंदिर व परिसरात दुर्गंधी पसरल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.येथील मारुती मंदिर अवघ्या ओझरकरांचे श्रद्धास्थान आहे. परंतु येथील भाविक दुर्गंधीने त्रस्त आहेत. मारुती मंदिरातील दरवर्षी भरत असलेला सप्ताह म्हणजे पर्वणी. परंतु यानिमित्त येथे येणारे संत-महंतदेखील दुर्गंधीतून सुटलेले नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे परिसरातील चहूबाजूने वाढलेले घाणीचे साम्राज्य, उघड्यावर शौचास जाणारे नागरिक, कमानीजवळ असलेले कचऱ्याचे ढीग, नदीकिनारी असलेल्या कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येथे स्वच्छता ठेवण्याची मागणी होत आहे.नागेश्वर मंदिरामागे शौचालय असूनदेखील रात्रीच्या वेळेस काही नागरिक रस्त्यावर शौचाला बसत असल्याची तक्रार आहे. येथे दर मंगळवारी सफाई कामगारांना स्वच्छता करावी लागते.अजूनदेखील हगणदारी मुक्तीसाठी प्रशासनाला यश आलेले नसल्याचे बोलले जात आहे. मंदिराबरोबरच येथे लागूनच असलेल्या स्मशानभूमीतील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्मशानभूमीमागील बांधलेले शौचालय कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. येथील बंद असलेले पथदीप उघड्यावर बसणाऱ्यांना अधिक सोयीचे ठरू पाहत आहे. येथून जवळच असलेल्या उर्दू शाळेमधील विद्यार्थ्यांचे आरोग्यदेखील शेजारी असलेल्या घाणीमुळे धोक्यात आले आहे. त्याचबरोबर पावसाळ्यानंतर येथील नदीपात्रात साचत असलेल्या घाणीमुळे वीटभट्टीवर राहणाऱ्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. ओझर गावामधील शाळकरी मुलांचा शाळेत जाण्या-येण्याचा मार्गदेखील हाच असल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.येथील नागरिकांची एकच मागणी आहे की, घाण-कचरा वेळोवेळी उचलून तेथे कचऱ्याच्या कुंड्या बसवाव्यात. उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, नदीकिनारी सुशोभिकरण करून स्वच्छतेबद्दल जनजागृती करावी, घंटागाड्यांची संख्या वाढवावी जेणेकरून गावातून येणारा जाणारा प्रत्येकजण मोकळा श्वास घेईल. (वार्ताहर)
ओझरच्या मारु ती मंदिर परिसरात दुर्गंधी
By admin | Updated: September 12, 2016 00:57 IST