पंचवटी : सुकेणकर लेनमधील गोळ्या-बिस्किटाचे व्यापारी सुनील छाबरिया यांच्यावर रविवारी (दि़५) सकाळी तिघा संशयितांनी सशस्त्र हल्ला करून रोकड लुटून नेल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या छाबरियांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पंचवटीत सुकेणकर लेनमधील वसंत अपार्टमेंटमध्ये सुनील ब्रिजलाल छाबरिया (४१) राहतात़ त्यांचा गोळ्या बिस्किटांचा व्यापार असून, रविवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास ते कल्याण (उल्हासनगर) येथे माल खरेदीसाठी जात होते़ त्यांच्या हातामध्ये असलेल्या कापडी पिशवीत रोकडही होती़ छाबरिया घराजवळून पंचवटी कारंजाकडे जात असताना दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी दोघांनी त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली, तर एकाने हातातील पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला़ मात्र हल्लेखोरांना प्रतिकार करीत असताना एकाने धारदार शस्त्राने छाबरिया यांचे हात, पाठ व पोटावर वार केले व पसार झाले़हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सुनील छाबरिया हे खाली पडले़ ही घटना शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ छाबरिया यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले़ या प्रकरणी छाबरिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)
पंचवटीत व्यापाऱ्यावर भरदिवसा सशस्त्र हल्ला
By admin | Updated: July 6, 2015 00:01 IST