कसबे सुकेणे : प्रति गाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त मंदिरात मंगळवारी दत्तजयंतीच्या पर्वकालावर जिल्ह्यासह राज्यभरातील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गदीॅ केली होती. मात्र, कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून संस्थानने भाविकांना दत्त दर्शन घेण्यास मुभा दिली. महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त मंदिरात विविध कार्यक्रम पार पडल. पंचावतार आद्यकारण हे दत्त प्रभू असून, महानुभाव पंथीय या मंदिराला दत्त मंदिर नावानेच ओळखतात. दत्त जयंतीनिमित्त पहाटे महंत सुकेणेकर बाबा यांच्या उपस्थितीत पूज्य अर्जुनराज सुकेणेकर, पूज्य बाळकृष्णराज सुकेणेकर, पूज्य राजधरराज सुकेणेकर , गोपीराजशास्ञी सुकेणेकर यांच्या हस्ते देवास चंदन उटी, काकड आरती होऊन महाआरती झाली. मौजे सुकेणे ग्रामस्थ उपस्थित होते. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. दत्त मंदिर व्यवस्थापनाने कोरोनाविषयक सर्व खबरदारी घेत, भाविकांना मास्क सक्तीचा करून दत्त दर्शनाचा लाभ दिला. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दुपारी आरतीच्या वेळी भाविकांनी विशेष गर्दी केली.
-----------------------
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आम्ही आठ महिने कुठेही बाहेर गेलो नव्हतो. दत्त जयंतीनिमित्त सुकेणेत दत्त दर्शन घेतले, मंदिरात मास्क सक्तीचा आहे, उपाययोजना व खबरदारी घेतली जात आहे.
- बाळासाहेब ठुबे, भाविक, खेडगाव
-----------
मौजे सुकेणे दत्त मंदिरात अबालवृद्ध भाविकांनी मास्क लावून दत्त दर्शन घेतले. (२९ सुकेणे १)