उपनगर-टाकळी कॉर्नरवर खड्डे
नाशिक : उपनगरकडून टाकळीरोडकडे वळताना रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने रात्रीच्या सुमारास दुचाकीचे अपघात घडत आहेत. रात्री खड्डा दिसत नसल्याने अनेक दुचाकीस्वार खड्ड्यात आदळून जखमी होत आहेत. येथील खड्डा त्वरित बुजवण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.
बसस्थानकांवर डिस्टन्सचा फज्जा
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू झाली असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, आता प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने बसस्थानके तसेच बसमध्ये डिस्टन्स नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. प्रवाशांची काळजी घेतली जात असल्याचे महामंडळाकडून सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच दिसते.
स्मार्टरोड पदपथावर दुचाकींची रांग
नाशिक : शहरातील स्मार्ट रोडवरील पदपथ दुचाकींसाठी पार्किंग झोन ठरत आहे. न्यायालय तसेच महसूल कार्यालयात कामानिमित्त आलेले नागरिक या पदपथावरच पार्किंग करीत असल्याने वाहनांची रांग पाहिल्यास हा पदपथ की पार्किंगस्थळ असा प्रश्न पडतो. सदर पार्किंग हटविण्याची मागणी होत आहे.
बुधवार बाजार पुन्हा ‘जैसे थे’
नाशिक : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्हा आणि मनपा प्रशासनाचे सुरक्षिततेचे नियम कायम आहेत. दैनंदिन व्यवहार सुरू करण्यासाठी शिथिलता देण्यात आली असली तरी सुरक्षित अंतर, मास्क तसेच सॅनिटायझर वापरण्याबाबतचे नियम कायम असताना बुधवार बाजारात मात्र नियमांचे पालन होत नसल्याचे दिसते.
वीज बिलांचा प्रश्न अजूनही कायम
नाशिक : महावितरणकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीज बिलांबाबत ग्राहकांना अजूनही शंका आहे. जादा वीज बिल येण्याची तक्रार कायम असून, वीज कार्यालयाकडून मात्र तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचे दिसते. लॉकडाऊननंतर ग्राहकांना जादा दराने वीज बिल येत असल्याच्या तक्रारींचा सूर कायम आहे.
सारडा सर्कलला वाहतूक विस्कळीत
नाशिक : सारडा सर्कल चौकातून फाळके रोड तसेच उर्दू शाळेकडे जाणाऱ्या वाहनधारकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने चौकातून जाणाऱ्या या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर कोंंडी होत आहे. या चाैकातून जुने नाशिकमध्ये जाणाऱ्या दुचाकी तसेच रिक्षाचालकांची नेहमीच वर्दळ असते. चौकातून जाताना मुख्य रस्त्यावरील वाहनधारकांना चौकात थांबावे लागते.