इगतपुरी : तालुक्यातील काही भागात बुधवारी विजेच्या कडकडाटात प्रचंड वादळ वाऱ्यांसह गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विविध रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. जनावरांचा चारासुद्धा भिजला असून, उघड्यावरील संसार असणारे संकटात सापडले आहेत. या भागातील वीटभट्ट्यांचेसुद्धा मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या भागातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजी. हंसराज वडघुले, इगतपुरीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी केली आहे. सायंकाळी वादळ वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. पूर्व भागातील बेलगाव तऱ्हाळे, धामणी, धामणगाव, पिंपळगाव मोर, भरविर, अडसरे, टाकेद, खेड आदी गावांना गारपिटीने फटका बसला. यामुळे टमाटे, कांदा, काकडी, दोडके, कोबी, मका, वालवड, गहू आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. रब्बी पिकांसह जनावरांचा चाराही भिजला. उघड्यावर असलेल्या संसाराचे मोठे नुकसान झाले. या भागातील वीटभट्ट्यांचे नुकसान झाले. आधीच कोरोनामुळे शेतकरी संकटात आहेत, त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करून आधार द्यावा, अशी मागणी पांडुरंग वारुंगसे, हंसराज वडघुले यांनी केली आहे.
------------
पाऊस, वादळ वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात अक्षरश: गारांचा ढीग झाला होता. पीक जगेल तरी कसे?
रब्बी पिकासाठी महागडी बियाणे, खते, कीटकनाशके फवारणी करून कसेबसे पीक जगवले हाेते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बँक, पतपेढी, खासगी सावकार यांच्याकडून काढलेले कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांचा झाला आहे. शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.
- पांडुरंग वारुंगसे,
माजी उपसभापती, इगतपुरी.
------------------
गेल्या काही वर्षांपासून ऋतू आणि हवामानामध्ये प्रचंड अनियमितता झाली असून, अवकाळी पाऊस, गारपीट अशा प्रकारच्या अस्मानी संकटांना शेतकऱ्याला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. यामुळे होणारे नुकसान आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना गर्तेत घालत आहे. आजपर्यंत आम्ही शेकडो मोर्चा, आंदोलने आणि संघर्षातून यावर आवाज उठवला आहे. पंचनाम्याचे फार्स न होता नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळायला हवी.
-हंसराज वडघुले, शेतकरी संघर्ष संघटना.