लोकमत न्यूज नेटवर्कवणी / पांडाणे : पिंपरी अंचला ते अहिवंतवाडी रस्त्यावरील मोरी अतिवृष्टीमुळे वाहून गेल्यानंतर या भागातील संपर्क सुरळीत होणेकामी सार्वजनिक बांधकाम विभागाने भराव टाकला; मात्र अवजड व मोठ्या वाहनांच्या वाहतुकीची समस्या कायम आहे. दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर-अहिवंतवाडी मार्गावरील मोरी क्षतिग्रस्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने मोरीलगत भराव टाकला. दरम्यान, कोल्हेर ते अहिवंतवाडी या मार्गावरील २६०० मीटर अंतराच्या रस्त्याचे काम एप्रिल २०१७ मध्ये पूर्ण करण्यात आले. या कामाचे अंदाजपत्रक ५९ लाख रुपये इतके आहे. एमपीएम कार्पेट सिलकोट स्वरूपाच्या रस्त्याची रूंदी ३.७५ (पावणेचार मीटर) व साइडपट्ट्या दोन्ही बाजूस एक मीटर अशा पद्धतीने रस्ता तयार करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता पाटील यांनी दिली. रस्त्याच्या कामाबरोबर मोऱ्यांची डागडुजी, दुरुस्ती, उंची वाढविणे गरजेचे होते; मात्र वेळेत त्या कामाला मंजुरी मिळाली नाही. तसेच सदर काम गट क प्रकारात मोडत असल्याने तांत्रिक अडचण आली तसेच मंजुरीअभावी प्रलंबित असलेल्या कामाचा पाठपुरावा सुरू असून संभाव्य ठिकाणी पूल बांधण्याचे नियोजन प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
अहिवंतवाडी रस्त्याचे अतिवृष्टीमुळे नुकसान
By admin | Updated: July 17, 2017 00:53 IST