--------
राष्ट्र पुरुषांच्या पुतळा परिसराची स्वच्छतेची मागणी
मालेगाव : शहरातील राष्ट्र पुरुषांचे पुतळे असलेल्या परिसराची महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच स्वच्छ पाण्याने परिसर धुवून काढावा. परिसरात सुशोभिकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
----------
मंगल कार्यालयांमधील गजबज वाढली
मालेगाव : कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून लग्नांसह सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी होती; मात्र आता लग्नसराई सुरू झाली आहे. शासनानेही १०० ते १५० लोकांमध्ये लग्न करण्यास परवानगी दिली आहे. परिणामी मंगल कार्यालयांमधील गजबज वाढली आहे.
-----------
कळवाडी ते देवघट रस्ता दुरुस्तीची मागणी
मालेगाव : कळवाडी ते देवघटदरम्यानचा रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक होत असते. तसेच कळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ असते. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
-----------
अपात्र लाभार्थींकडून रक्कमेची वसुली सुरू
मालेगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान मानधन योजनेत एक हजार २०१ लाभार्थी अपात्र आढळून आलेत. त्यांच्याकडून ९८ लाख ४२ हजार रुपये एवढी लाभाची रक्कम वसूल केली जात आहे. यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.
----------
२५ हजार मतदार बोगस असल्याची तक्रार
मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात २५ हजार २४२ बोगस मतदार असल्याची तक्रार माजी आमदार आसीफ शेख यांनी प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. एक व्यक्ती एक मत हे शासनाचे धोरण आहे; मात्र राजकीय स्वार्थासाठी एक व्यक्ती अनेक मते या धोरणाचा वापर केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शेख यांनी केली आहे.
-------------------
शैक्षणिक दाखल्यांचे वाटप सुरू
मालेगाव : येथील तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र व महा-ई-सेवा केंद्राकडून गेल्या आठ महिन्यात विविध प्रकारचे ३० हजार २१२ दाखल्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी दाखल्यांची गरज असते. यासाठी पालक व विद्यार्थी गर्दी करीत असतात.
------------
नेहरू युवा केंद्राकडून स्वच्छता मोहीम
मालेगाव : तालुक्यातील टिंगरी येथे नेहरू युवा केंद्रातर्फे एकदिवसीय युवक मार्गदर्शक शिबिर व गाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. युवकांनी निरोगी, सुदृढ आरोग्यविषयी गावात जनजागृती केली.
-----------
पाटणेला कार्तिक पौर्णिमा उत्साहात
मालेगाव : तालुक्यातील पाटणे येथील शिवालय आश्रमात कार्तिक पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
----------
सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ
मालेगाव शहर परिसरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या दुचाकीवरून आलेल्या भामट्यांकडून सोनसाखळी लंपास केली जात आहे. पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.