नाशिक : सुरगाणा तालुक्यात सोमवारी सात ते आठ कावळे मृत आढळून आल्याने पक्षी पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. कावळ्यांच्या अचानक मृत्यू होण्यामागे ‘बर्ड फ्लू’चा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नमुने घेतले आहेत. राज्याच्या अन्य भागात कावळे तसेच अन्य पक्षी मृत्युमुखी पडत असल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्यातील उंबरदे व आलंगून या ठिकाणी काही कावळे मृत्युमुखी पडल्याचे ग्रामस्थांना आढळले. उंबरदे येथे सात ते आठ तर आलंगून येथे एक कावळा मरण पावल्याचे पाहून ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी पथकासह सुरगाणा गाठले. मरण पावलेल्या कावळ्यांचे नमुने घेण्यात आले असून, ते पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. सुरगाणा हा गुजरात राज्याला लागून आहे.
सुरगाण्यात दगावले कावळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 01:37 IST