निकवेल : बागलाण तालुक्यातील मुल्हेर किल्ला विकासापासून वंचित असल्याने या किल्ल्यावरील देव-देवतांच्या मंदिराचा जीर्णोद्धार होण्याची अत्यंत गरज असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली आहे.मुल्हेर किल्ल्यावर विविध राजवटीच्या काळातील वस्तू आजपावेतो आहेत. त्यामध्ये विविध देव-देवतांची मंदिरे, मूर्ती आहेत. त्यात श्रावणी सोमवारी (दि. ३१) येथील सोमेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक आले होते. सदर किल्ल्यावर जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय नसल्याने भाविकांना ५ ते ६ किलोमीटर जंगलामधून पायपीट करावी लागत आहे. येथील सोमेश्वर मुल्हेर किल्ल्यावरील सोमेश्वर (महादेव मंदिर) हे जागृत देवस्थान मानले जाते. सदर मंदिर हे घनघाट जंगलामध्ये असून मंदिराकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे; मात्र या रस्त्यावरून कुठलेही वाहन जात नाही. पायी गेल्यास सुमारे ८ किलोमीटर चालावे लागते. मुल्हेर किल्ल्याची सद्यस्थिती पाहता विकास होणे फार गरजेचे आहे. किल्ल्यावर विविध पुरातन वास्तूंचा संग्रह आहे. त्यात तोफा, दरवाजा, पायऱ्या, विहीर, हत्ती टाका, मोती टाका, टाक देवीची मूर्ती, राजवाडा, रामेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, चंदन विहीर, गणेश मंदिर, तलाव, गुहा, तटबंदी गुहा, भडंगनाथ मंदिर, मोरागड आदि पुरातन वस्तू तसेच मंदिर, राजाचा राजवाडा किल्ल्यावर बघण्यास मिळतात. तेथील तलावात आजही मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध आहे. महादेव मंदिर आकर्षक असून शिवलिंग दर्शनासाठी १० ते १५ फूट खाली उतरून जावे लागते; मात्र मंदिरामध्ये विद्युत रोषणाई नसल्याने भाविकांना दर्शनासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. तरी शासनाने मुल्हेर किल्ल्यावर लक्ष केंद्रित करून मुल्हेर किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा अशी मागणी भाविकांनी, इतिहासप्रमींनी व ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
मुल्हेर किल्ल्यावरील शिवमंदिरात गर्दी
By admin | Updated: September 2, 2015 23:18 IST