इंदिरानगर : परिसरातील रेशन दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत मोफत तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. अंत्योदय लाभार्थी आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्यवर्गातील घटकातील लाभार्थ्यांची मोफत तांदूळ घेण्यासाठी गर्दी उसळली असून, परिसरातील स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना हा तांदूळ वाटप करण्यात येत आहे.लॉकडाउन सुरू झाल्यापासून सर्वत्र रोजगार ठप्प झाल्याने हातावर पोट भरणाऱ्या कष्टकरी रोजंदारीवर काम करणाºया कामगारांचे व सर्वसामान्य कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारकडून नियमित स्वस्त धान्यासोबतच मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना पाच किलो मोफत तांदूळ देण्यात येत आहे. तसेच रेशन कार्डधारकांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळचे वाटप सोशल डिस्टन पाळून वाटप करण्यात येत असून, दररोज सुमारे ५० रेशन कार्डधारक धान्य घेऊन जात आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांव्यतिरिक्त ६० हजारांहून अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांकडूनही धान्याची मागणी होत असल्याने काही ठिकाणी गोंधळ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे धान्य वितरण कार्यालयीन अधीक्षकांनी ६० हजारांहून अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी धान्य उपलब्ध झालेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, रेशन दुकानात धान्य वाटप प्रक्रियेची प्रभागाचे नगरसेवक तथा सभागृहनेता सतीश सोनवणे, नगरसेवक सुप्रिया खोडे, संगीता जाधव यांनी पाहणी केली.
मोफत तांदूळ घेण्यास उसळली लाभार्थ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:27 IST