संदीप भालेराव, नाशिक: गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. रविवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपिटीमुळे तर नुकसानीत अधिकच भर पडली असून गेल्या तीन दिवसात जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधील ८ हजार ४०० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यात नाशिकला मोठा फटका बसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा फटका बसत आहे. या पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले तर शेतामध्ये काढून ठेवलेल्या कांद्याही भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कांदा, टमाट्यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १४५ गावांमधील १३, २८४ शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. द्राक्ष बागांची काढणी सुरू असल्याने अनेक बाागांना फटका बसला तर उन्हाळ कांद्याचे देखील नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. गतवर्षी खरीप आणि रब्बी हंगामानंतर अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले होते यंदा देखील अवकाळीचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"