नांदगाव : शेळ्या, बकऱ्यांपाठोपाठ लाखो रुपयांच्या गायी, बैल पळविण्यात येत असल्याच्या प्रकाराने पशुधारक व शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या भीतिपोटी पाळत ठेवलेल्या बाणगाव ग्रामस्थांनी मध्यरात्री गायी, बैल वाहून नेणाऱ्या टेम्पोला अडवून त्यातल्या मंडळींची यथेच्छ धुलाई केल्याची घटना घडली. दरम्यान, सततच्या या प्रकाराने पोलीस ही चक्रावले आहेत.बाणगाव येथून गेल्या काही दिवसांत दहा ते १२ गायी चोरीला गेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत कवडे, भावराव शिंंदे, सुरेश कवडे व बाळू शिंंगाडे यांच्या गायी चोरीला गेल्या. त्यापूर्वी सहा जणांच्या गायी पळविण्यात आल्या. बाणगाव येथील घटनेत एका छोट्या टेम्पोमध्ये जबरदस्तीने दाबून बसविलेली सुमारे अडीच लक्ष रुपये किंमतीची एकूण अकरा, जनावरे रात्री पाळत ठेवलेल्या बाणगावकरांनी उतरवली. सदर टेम्पो बोरवेली(जिल्हा दोंड) येथून औरंगाबादकडे चालला होता. त्याआधीच्या घटनेत बाणगावच्या चार गायी पळविणाऱ्या क्रमांक (आरजे 0२ एजी ८०४१) या टेम्पोचा चित्तथरारक पाठलाग ग्रामस्थांनी केला. येवला-कोपरगाव रस्त्यावर पथकर नाक्यावर सदर टेम्पोची व्हिडिओ फित ही निघाली आहे. नाक्यापुढे पाठलाग करणे धोक्याचे वाटल्याने ग्रामस्थांनी येवला पोलीस स्टेशन गाठले. परंतु तिथल्या पोलिसांनी दखल घेतली नाही. अन्यथा पळून जाणारा टेम्पो सापडला असता असे पाठलाग करणाऱ्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशाच घटना वैजापूर (जि.औरंगाबाद), कळवण, मालेगाव व धुळे यथे घडल्या असून, नांदगाव पोलीस या सर्व घटनांमधील धागेदोरे तपासत आहेत. पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी पोलिसांच्या जोडीला ग्रामस्थांची दले तयार करून रात्रीची गस्त वाढवली आहे.बाणगावच्या ग्रामस्थांनी अशाप्रकारे पळणारी गाडी रोखण्यासाठी टायरचे तुकडे जोडून त्याला खिळे ठोकून टोकदार पट्टा तयार केला आहे. दरम्यान, बाणगाव येथे अडविण्यात आलेल्या टेम्पोमधील ११ जनावरांच्या मूळ मालकांचा शोध पोलीस घेत आहेत. गेल्या महिनाभरात नांदगाव परिसरातील दिनेश रखमाजी गवळी (जतपुरा रोड), अशोक पंगुडवाले, (शनि चौक), समाधान दाभाडे(मस्तानी अम्मा दर्गा) यांच्या घराबाहेर कॅमेरा बसवला असून, त्यात गाय पळविणाऱ्यांचे चित्र रेकॉर्ड झाले असले तरी ते अस्पष्ट आहे. संतोष पाटील(जगधने वाडा), टेहळे (दहेगाव रस्ता मळा) याशिवाय अजूनही गायी चोरीला गेल्या आहेत. या चोरांचा बंदोबस्त केव्हा होईल, असा सवाल विचारला जात आहे़ (वार्ताहर)नाशकातही जनावरांची चोरी ४नांदगाव परिसरात अज्ञात चोरटे मोटारसायकली व टेम्पोमधून येतात. घराबाहेरची जनावरे काही मिनिटांत टेम्पोत टाकून ते फरार होतात. बाणगाव येथील मंगला कवडे या महिलेने गाय पळवून नेणाऱ्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर दगडफेक केली. पाठलाग करणाऱ्यांच्या अंगावर अशाचप्रकारे टेम्पोतून दगडफेक करत, निसटून जाण्यात ते यशस्वी होत आहेत. याच पद्धतीने नाशकातही जनावरांची चोरी होत आहे़ टाकळीरोड, तपोवन या परिसरातील मळ्यांमधून बांधलेली जनावरे रात्रीच्या वेळी सोडून नेली जातात़ यासाठी मुख्य रस्त्यावर टेम्पो थांबविला जातो़ या टेम्पोत ही जनावरे टाकून चोरटे घेऊन जातात़ या प्रकार पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी केली जाते़ तपोवनातील विलास नामदेव शेलार, बाळासाहेब माधवराव थोरात, विष्णू थोरात आदि शेतकऱ्यांची जनावरे चोरून नेली आहेत़ त्यांच्या तपास अद्याप लागलेला नाही़ कोणत्याही क्षणी जनावरे चोरीस जातील या भीतीने नाशकातील शेतकरी धास्तावला आहे़