नाशिक : हरित न्यायाधिकरणात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेली याचिका निकाली निघाल्यानंतर नगरसेवक तथा वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य संजय चव्हाण यांनी संबंधित याचिकाकर्त्याविरुद्ध अबु्रनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना याचिकाकर्ते ऋषिकेश नाझरे यांनी चव्हाण यांना प्रतिआव्हान दिले असून, यामुळे पर्यावरणप्रेमी विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.शहरात बेसुमार वृक्षतोड होत असल्याने नाझरे यांनी पुण्याच्या हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती आणि पालिकेची वृक्ष प्राधिकरण बरखास्तीची मागणी केली होती. तसेच अन्य मागण्यादेखील करण्यात आल्या होत्या; परंतु दोन दिवसांपूर्वी न्यायाधिकरणाने याचिका फेटाळताना याचिकाकर्त्याना उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली. त्यानंतर संजय चव्हाण यांनी याचिकाकर्त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास झाल्याने उच्च न्यायालयात अबु्रनुकसानीचा दावा करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे नाझरे यांनी न्यायालयाचा निर्णय समजावून न घेता हा प्रकार केल्याचे म्हटले आहे. उच्च न्यायालयात वृक्षतोडीबाबत अंतरिम आदेश देण्यात आले असून, त्यात दाद मागण्याचा मार्ग खुला आहे. त्याची पुरेशी माहिती न घेता चव्हाण यांनी केलेले विधान चार दिवसांत मागे घ्यावे आणि सात दिवसांत आपल्याविरुद्ध खटला दाखल करून दाखवावा; अन्यथा आपणच चव्हाण यांच्यावर कारवाई करू, असे त्यांनी चव्हाण यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
नगरसेवक विरुद्ध पर्यावरणप्रेमी
By admin | Updated: May 31, 2014 00:28 IST