सातपूर : कोविड आणि भंगार मार्केट हटविल्याने त्यांच्याकडे असलेली थकबाकी याचा मोठा परिणाम यंदा महापालिकेच्या थकबाकी वसुलीवर झाला आहे. सातपूर विभागातून अवघी ३० टक्के घरपट्टी, १८ टक्के पाणीपट्टी आणि फक्त ३ टक्के विविध कर वसुली झाली आहे. गेल्या २९ वर्षांतील वसुलीचा नीचांक समजला जात आहे. एमआयडीसीकडून मात्र सर्वाधिक म्हणजे ८४ टक्के वसुली झाली आहे.
सातपूर विभागात ५० हजार ५८८ मिळकती आहेत; तर ३२ कोटी ३५ लाख रुपयांचे उद्दिष्ट्य वसुलीसाठी होते. त्यापैकी अवघ्या १० कोटी ७६ लाख रुपयांची घटपट्टी वसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे, तर विभागात २९ हजार ६२० नळ कनेक्शन आहेत. १८ कोटी ८६ लाख रुपयांची पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट्य होते. त्यापैकी अवघ्या ३ कोटी ५४ लाख रुपयांची वसुली झाली आहे. ही वसुली जवळपास १८ टक्के आहे. थकबाकी असलेल्या २५ लोकांचे नळकनेक्शन बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. विविध कर वसुली तर नाममात्र झाली आहे. ५ कोटी २० लाख रुपयांचे उद्दिष्ट्य असले, तरी अवघी ४७ लाख रुपयांची म्हणजे केवळ ३ टक्के वसुली झाली आहे. एमआयडीसीकडून ८ कोटी ५५ लाख ६८ हजार रुपयांपैकी ५ कोटी रुपयांची सर्वाधिक म्हणजेच जवळपास ८४ टक्के वसुली झाली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारलेल्या अतिरिक्त विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी ठोस पावले उचलल्यामुळे ही वसुली होऊ शकली आहे.
इन्फो
थकबाकी वसुलीसाठी ॲक्शनप्लॅन तयार करण्यात आला असून, ३१ मार्चनंतर घरपट्टी वसुलीसाठी धडक जप्ती मोहीम, नळपट्टी वसुलीसाठी नळ कनेक्शन बंद करणे आणि विविध कर वसुलीसाठी गाळे जप्ती मोहीम राबविण्यात येणार आहे. नळ कनेक्शन बंद करूनही चोरुन पाणी वापरले जात असल्याचे निदर्शनास आल्याने यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- नितीन नेर, विभागीय अधिकारी.
इन्फो
सातपूर औद्योगिक वसाहतीतील नॅटेल्को कंपनीकडे गेल्या १७ वर्षांपासून लाखो रुपयांची थकबाकी होती. कंपनी मालकाचा शोध लागत नव्हता. घरपट्टी विभागातील कर्मचारी चंद्रकांत घाटोळ यांनी मालकाचा शोध लावला. त्याला अभय योजनेचा लाभ देत ४८ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली.
इन्फो
२०१७ मध्ये सातपूर अंबड रस्त्यावरील अनधिकृत भंगार मार्केट हटविण्याची धडक मोहीम महापालिकेनेच राबविली. येथील भंगार व्यावसायिक अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. त्यापैकी २३७ व्यावसायिकांकडे ६८ लाख ४० हजार रुपयांची थकबाकी थकलेली आहे. आता या थकबाकीदारांचा थांगपत्ता लागत नाही.