जिल्ह्यातील मतदारयादीत दुबार नावे आढळून आल्यानंतर १ नोव्हेंबरपूर्वी म्हणजेच अंतिम मतदारयादी जाहीर होण्यापूर्वी यादीचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आता नियोजन केले जात असून, सर्व मतदारसंघांत मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेबरोबरच जिल्ह्यातील संस्थांनादेखील या मोहिमेत सहभागी करून घेताना दुबार नावे नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र देण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी तसेच अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्थांचे अधिकारी व कर्मचारी यांचे दुबार मतदार नोंदणी नसल्याचे विहीत नमुन्यात स्वयंघोषणापत्र व प्रमाणपत्र संस्थाप्रमुखांच्या स्वाक्षरीसह २७ सप्टेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्व मतदार संघांमध्ये मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील विविध मतदार संघांतून दुबार मतदार नोंदणी संदर्भात विविध संस्था तसेच राजकीय पक्ष यांच्याकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणी करुन मतदार यादी शुद्धीकरणाबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.